चिखली (बातमीवाला): चिखली विधानसभा मतदारसंघात येत्या काळात होणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीसाठी एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. ही बैठक आमदार श्वेता महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलीतील अंबिका अर्बन सभागृहात पार पडली. यावेळी चिखली मतदारसंघातील विविध जिल्हा परिषद गटांमधील इच्छुक उमेदवार, सक्रिय पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुख मोठ्या संख्येने हजर होते.
बैठकीत बोलताना आमदार श्वेता महाले पाटील यांनी कार्यकर्त्यांना जनतेच्या जवळ जाण्याचे आणि त्यांच्या दैनंदिन समस्या सोडवण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, की फक्त निवडणुकीच्या वेळीच बाहेर पडण्याऐवजी नेहमीच नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. जो व्यक्ती जनतेशी खऱ्या अर्थाने जोडला जाईल, तोच खरा लोकप्रतिनिधी म्हणून ओळखला जाईल. म्हणूनच प्रत्येक गटातील मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्या गरजा जाणून घ्या आणि त्यांचा विश्वास जिंका.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, की महायुतीच्या नियमांचे पालन करून युतीतील जास्तीत जास्त उमेदवारांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटांमध्ये विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. युतीचे निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोपवण्यात आले असले, तरी शेवटी उमेदवार कोण असेल हे जनताच ठरवेल, कारण जनता हीच खरी निर्णय घेणारी शक्ती आहे.
या बैठकीत आमदार महाले पाटील यांनी इच्छुक उमेदवारांना जनतेच्या शेवटच्या घटका पर्यंत जाऊन काम करण्यास सांगितले. उमेदवारीच्या दृष्टीने आणि जनतेच्या फायद्यासाठी विविध सामाजिक कार्यक्रम, जनसंपर्क मोहिमा आणि शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले. या शिबिरांना स्वतः उपस्थित राहून त्या पाहणी करतील, असेही त्यांनी सांगितले. जो कार्यकर्ता जनतेशी खरोखर जोडला जाईल, त्याचे मूल्यमापन तालुका मंडळ प्रमुख करतील आणि त्यानंतरच उमेदवारी निश्चित होईल, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
बैठकीला कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी होती, ज्यामुळे निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे.














