Trump Putin Zelenskyy Meeting: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अलास्कामधील भेटीला “महत्त्वपूर्ण आणि वेळेवर” असल्याचे वर्णन केले आहे. क्रेमलिनने जारी केलेल्या निवेदनानुसार, पुतीन यांनी ही चर्चा “ठोस” असल्याचे म्हटले असून, युक्रेनमधील संघर्ष शांततेने सोडवण्याची तयारी दर्शवली आहे. तथापि, शुक्रवारी 15 ऑगस्ट अलास्कातील जॉइंट बेस एल्मेंडॉर्फ-रिचर्डसन येथे झालेल्या या बैठकीत युद्धविरामाचा कोणताही करार होऊ शकला नाही, असे ब्लूमबर्गने नमूद केले आहे.
या भेटीत रशियाने युक्रेनच्या डोनबास प्रदेशातील नियंत्रण सोडण्याची मागणी केल्याचे समोर आले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी यापूर्वीच रशियाला कोणतीही जमीन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ट्रम्प यांनी युरोपीय नेत्यांशी फोनवर बोलताना सांगितले की, पुतीन यांनी डोनबास प्रदेश युक्रेनने सोडावा अशी अट ठेवली आहे. यावर युरोपीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून, या चर्चेतून पुतीन यांचाच फायदा होत असल्याचे मत त्यांनी नोंदवले आहे.
ट्रम्प-पुतीन भेटीनंतर आता युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चेला गती मिळणार आहे. ट्रम्प सोमवारी 18 ऑगस्ट वॉशिंग्टनमधील ओव्हल ऑफिसमध्ये झेलेन्स्की यांना भेटणार आहेत. ही बैठक युक्रेन-रशिया युद्धाला नवे वळण देऊ शकते, अशी अपेक्षा आहे. युरोपीय नेत्यांनाही या बैठकीत सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
व्हाइट हाऊसने ट्रम्प-पुतीन भेटीतील तपशील जाहीर करण्यास नकार दिला आहे. तथापि, पुतीन यांनी युक्रेनमधील युद्धाची कारणे आणि शांतता प्रक्रियेवर चर्चा केल्याचे क्रेमलिनच्या निवेदनात म्हटले आहे. युक्रेनमधील युद्ध गेल्या साडेतीन वर्षांपासून सुरू आहे आणि यामुळे दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे.
या बैठकीकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील सोमवारची भेट युद्धविराम किंवा शांतता कराराच्या दिशेने पाऊल टाकेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.