Trump-Putin Alaska Summit: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या अत्यंत चर्चेत असलेल्या अलास्का शिखर परिषदेपूर्वी अँकरेज शहर आणि अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसने विक्रमी सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. फक्त एका आठवड्याच्या तयारीत हा संपूर्ण ऑपरेशन साकारला जात आहे.
या बैठकीसाठी अमेरिकन सीक्रेट सर्व्हिस आणि रशियन सुरक्षा पथक एकाच ठिकाणी, पण स्वतंत्र सुरक्षा वर्तुळात तैनात असतील. विशेष म्हणजे, दोन्ही बाजूंमध्ये प्रत्येक सुरक्षा व्यवस्थेत पूर्ण समता ठेवली जात आहे – “बॉडी टू बॉडी, गन टू गन” या तत्वानुसार जितके अमेरिकी एजंट तैनात असतील तितकेच रशियन एजंटही असतील. दरवाजे उघडणे, वाहन वापरणे किंवा मीटिंग रूममध्ये एजंट्सची संख्या – प्रत्येक बाबतीत सममिती राखली जाणार आहे.
बैठक जॉइंट बेस एल्मेंडॉर्फ–रिचर्डसन या अलास्कातील सर्वात मोठ्या लष्करी तळावर होणार आहे. हा तळ थेट सार्वजनिक प्रवेशासाठी बंद असून, नियंत्रणात असलेली हवाई हद्द, कडक सुरक्षा दरवाजे आणि तत्काळ लष्करी सहाय्य मिळविण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे पर्यटक हंगामामुळे हॉटेल्स आणि भाड्याच्या गाड्यांची कमतरता असली तरी या तळामुळे अनेक अडचणी टळल्या आहेत.
स्थानिक हॉटेल्स, गाड्यांचे भाडे बाजार, अगदी कॉफी शॉप्स आणि पार्किंग परिसरातही सीक्रेट सर्व्हिसचे एजंट्स तैनात आहेत. अनेक मोटरकेड वाहनं आणि सुरक्षा साहित्य अमेरिकेच्या इतर भागांतून हवाई मार्गे आणण्यात आले आहे. अलास्काचे राज्यपाल माईक डनलिव्ही यांनी या परिषदेचे वर्णन “शहराच्या इतिहासातील मोठ्या घटनांपैकी एक” असे केले आहे.
दोन्ही देशांचे भाषांतरकार, होल्ड रूम्सची संख्या, तसेच आगमनापासून ते बैठक संपेपर्यंत प्रत्येक हालचालीचे वेळापत्रक काटेकोरपणे आखले गेले आहे. सीक्रेट सर्व्हिस अजूनही रशियन बाजूकडून अंतिम सुरक्षा मंजुरीची प्रतीक्षा करत आहे.
ट्रंप यांनी या भेटीला “रशिया–युक्रेन युद्ध समाप्तीच्या दिशेने एक प्रयत्न” असे संबोधले असून, प्रादेशिक तडजोडीचा पर्यायही त्यांनी सूचित केला आहे. दुसरीकडे, पुतिन यांनी ट्रंपच्या या प्रयत्नांचे कौतुक करत आर्थिक सहकार्य आणि नवीन शस्त्र नियंत्रण कराराची शक्यता व्यक्त केली आहे.
अँकरेजमध्ये सध्या उच्च सुरक्षा वातावरण असून, दोन्ही राष्ट्राध्यक्षांच्या प्रत्येक हालचाली स्वतंत्र, सुरक्षित आणि सुयोग्य समन्वयात पार पडण्यासाठी शेकडो एजंट्स रात्रंदिवस कार्यरत आहेत.