चोरी? लाच? किंवा आणखी काय?.. मान्यवरांकडून राहुल बोंद्रे यांचा निषेध…
चिखली (बातमीवाला): आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राहुल बोन्द्रे यांच्या म्हणण्यानुसार निवडणूक आयोगाला प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी बुलडाणा यांना चौकशीसाठी पाठविलेले ‘गोपनीय’ पत्र बोंद्रे यांनी त्यांच्या फेसबुक आणि इतर सोशल मीडिया खात्यांवर प्रसारित केले आहे.

या पत्राच्या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण झाले आहेत जसे संबंधित पत्र अद्याप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही प्राप्त झाले नसताना ते राहुल बोंद्रे यांच्या सोशल मीडियावर कसे पोहोचले, हा प्रश्न निर्माण झाला आहे. “सदर पत्र कोणत्या अधिकाऱ्यांकडून मिळाले? अधिकृतरीत्या नसेल तर चोरी, वाममार्ग किंवा राजकीय हेतूने मिळवले आहे का?” आदर्श आचारसंहिता लागू असताना गोपनीय कागदपत्र व्हायरल करणे हा आचारसंहितेचा भंग ठरू शकतो, याबाबत माहिती असतानाही राहुल बोंद्रे यांनी एका जिल्हाधिकाऱ्याला सन्माननीय निवडणूक आयोगाकडून आलेले पत्र कसे मिळवले? हा प्रश्न निर्माण होत आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियाला हे पत्र टाकताना त्यामध्ये एडिट करून विद्याधर महाले यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करून लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सर्व समाजातील प्रतिष्ठित लोकांनी राहुल बोंद्रे यांच्या या कृतीचा निषेध केला आहे.
‘खोटे बोल पण रेटून बोल’ ही जुनी सवय…..समाजातील प्रतिष्ठितांचा निषेध
सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या या पत्रासोबत राहुल बोंद्रे यांनी केलेल्या इतर आरोपांवरही समाजातील विविध स्तरांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. “खोटे बोल पण रेटून बोल” ही त्यांची जुनी पद्धत असल्याचा आरोप काही प्रतिष्ठित नागरिकांनी केला आहे.
विशेषतः, बोंद्रे यांनी केलेल्या “मा. मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले हे आचारसंहिता लागू असताना भाजपा या पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.” या दाव्यावर वस्तुस्थिती सादर करण्यात आली आहे. चौकशीत असे स्पष्ट झाले की विदयाधर महाले ज्या ‘अंबिका अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी’च्या दीपावली मिलन कार्यक्रमाला उपस्थित होते, तो कार्यक्रम दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी, म्हणजेच आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच झाला होता. त्यामुळे “आचारसंहिता भंग” हा आरोप वास्तवाधारित नसल्याचे व फक्त लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी केला आहे असे समोर आले आहे.

विद्याधर महाले यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक…
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, श्री विद्याधर महाले हे राजकारणापलीकडे जाऊन लोकांची कामे तातडीने करण्यासाठी ओळखले जातात. शनिवार–रविवार किंवा सुट्टीच्या दिवशीही ते कोणत्याही जनतेच्या अर्जाला वेळ देतात. त्यांच्या हस्तक्षेपामुळे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. “अनेक अधिकारी सुट्टीला कुटुंबासोबत वेळ घालवतात, पण महाले मात्र जनतेच्या कामात झोकून देतात. अशी समाजसेवेची वृत्तीच खरी अधिकारीधर्म आहे,” असे मत काही प्रतिष्ठित नागरिकांनी व्यक्त केले.
सार्वजनिक जीवनातील जबाबदारी आणि सोशल मीडिया वापराचा प्रश्न
राहुल बोंद्रे यांनी गोपनीय पत्र सोशल मीडियावर प्रसारित केल्याने प्रशासनिक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची व बोंद्रे यांची भूमिका स्पष्ट व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे…
या निवेदनावर समाजातील प्रतिष्ठित लोकांनी आपली स्वाक्षरी देऊन आपला निषेध नोंदवला आहे त्यामध्ये प्रामुख्याने प्रेमराजजी भाला, ऍड. विजयकुमार कोठारी, डॉ. प्रतापसिंह राजपूत,रामदास देवढे, सतीशजी गुप्ता,रामकृष्ण शेटे, सुधीर तांबट, निखिल शेटे, शहजाद अली खान, सुभाष खरात, दत्ता खरात, रामेश्वर कोकाटे, सुरेंद्र ठाकूर, राज पटेल, शिवाजी खेडेकर, प्रल्हाद भुसारी, अशोकराव पाटील, निवृत्ती देशमाने, संजय गाडेकर, माधवराव जपे इत्यादी मान्यवरांनी स्वाक्षरी करून आपला निषेध नोंदविला आहे.














