मुंबई (बातमीवाला): महाराष्ट्र राज्यात पोलीस दलाच्या विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती होणार असून, एकूण १५,६३१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ही भरती प्रक्रिया आजपासून म्हणजेच २९ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.
या भरतीअंतर्गत पोलीस शिपाई, चालक शिपाई, बॅण्डसमन, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशी विविध पदे भरली जाणार आहेत. पदनिहाय रिक्त जागांचा तपशील असा: पोलीस शिपाईसाठी १२,३९९, चालक शिपाईसाठी २३४, सशस्त्र पोलीस शिपाईसाठी २,३९३, कारागृह शिपाईसाठी ५८० आणि बॅण्डसमनसाठी २५ जागा. एकूण मिळून १५,६३१ पदे उपलब्ध आहेत.
उमेदवारांनी किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक तपशील जाहिरातीत नमूद करण्यात आला आहे. वयोमर्यादा १ ऑगस्ट २०२५ या तारखेनुसार खुल्या वर्गासाठी १८ ते २८ वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी १८ ते ३३ वर्षे आहे.
अर्ज शुल्क खुल्या वर्गासाठी ४५० रुपये तर मागासवर्गीयांसाठी ३५० रुपये आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्हे असणार आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपाची असून, उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन अर्ज भरावा लागेल. महत्त्वाचे नियम असे की, एका पदासाठी फक्त एकाच जिल्ह्यात एकच अर्ज करता येईल. वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज केल्यास ते बाद ठरतील.
निवड प्रक्रिया मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेवर आधारित असेल. मैदानी चाचणीत किमान ४० टक्के गुण मिळवणाऱ्यांमधून एका पदासाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होईल. त्यानंतर लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल.
विविध जिल्ह्यांतील पोलीस शिपाई पदांच्या रिक्त जागांचा काही तपशील असा: जालना १५६, सोलापूर ग्रामीण ९०, सोलापूर पोलीस विभाग ७९, पालघर २०२, बीड १७४, रत्नागिरी ०८, जळगाव १७१, नागपूर ग्रामीण २७२, मिरा-भाईंदर-वसई-विरार ८३७, नवी मुंबई ३९६, मुंबई २,४५९, पुणे ५४, नांदेड १९९, रत्नागिरी १००, अहिल्यानगर ७३, नागपूर ५९६, अमरावती २१४ आणि पुणे १,७३३ जागा. अधिकृत जाहिरातींसाठी संबंधित जिल्हा पोलीस संकेतस्थळे किंवा दिलेल्या लिंक्सचा संदर्भ घ्यावा.
ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने राबवली जाणार असून, उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.














