PNG Jewellers FY26 Target: भारतातील आघाडीच्या ज्वेलरी रिटेल कंपन्यांपैकी एक असलेल्या पी.एन. गाडगीळ ज्वेलर्सने आर्थिक वर्ष 2026 (FY26) साठी 9,000 ते 9,500 कोटी रुपयांचे महसूल लक्ष्य ठेवले आहे, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ विद्याधर गाडगीळ यांनी दिली. यामध्ये फ्रँचायझी व्यवसायाचा वाटा सुमारे 12% असेल, तर कंपनी 4% नफा मार्जिन (PAT) राखण्याचा प्रयत्न करेल, असे त्यांनी नमूद केले.
“आमचे फ्रँचायझी व्यवसाय FY26 मध्ये एकूण महसुलाच्या 12% असेल. यातून सुमारे 1,000 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. फ्रँचायझी व्यवसायातून 2.5 ते 3% निव्वळ उत्पन्न मिळेल, तर एकूण 4% नफा मार्जिन राखण्याचे आमचे लक्ष्य आहे,” असे गाडगीळ यांनी NDTV प्रॉफिटशी बोलताना सांगितले.
कंपनीने लॅब-निर्मित हिऱ्यांपासून (LGD) सध्या अंतर राखण्याचा निर्णय घेतला आहे, कारण ग्राहकांमध्ये त्याची मागणी कमी आहे. “सध्या लॅब-निर्मित हिऱ्यांना मागणी नाही. ग्राहक नैसर्गिक हिऱ्यांसह उत्तम ज्वेलरीला प्राधान्य देत आहेत,” असे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.
सोने आणि हिऱ्यांचे वाढते दर असूनही कंपनीने हेजिंग धोरणाद्वारे आपले नफा मार्जिन राखले आहे. “सार्वजनिक कंपनी म्हणून आम्ही 100% हेजिंग करतो. यामुळे सोन्याच्या किमतीतील चढ-उतारांचा परिणाम कमी होतो. हिऱ्यांचे प्रमाण वाढल्याने उत्पादन खर्च कमी होतो, ज्याचा फायदा आम्हाला होतो,” असे गाडगीळ यांनी सांगितले.
सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहक जुने सोने देऊन नवीन ज्वेलरी खरेदी करत आहेत. सध्या 40-45% व्यवहार अशा स्वरूपाचे आहेत, ज्यामुळे कंपनीला मेकिंग चार्जेसमधून चांगले मार्जिन मिळत आहे.
कंपनी सेबीच्या नियमांनुसार आपली प्रवर्तक हिस्सेदारी 86% वरून 75% पर्यंत कमी करण्यासाठी क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (QIP) ची योजना आखत आहे. “आम्हाला तातडीने भांडवलाची गरज नाही, कारण अंतर्गत उत्पन्नातून आम्ही विस्तार करत आहोत. तरीही, QIP मधून मिळणारा निधी विस्तारासाठी वापरला जाईल,” असे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र-आधारित ही ज्वेलरी रिटेल कंपनी आपल्या विस्तारावर लक्ष केंद्रित करत आहे. FY26 मध्ये 20-25 नवीन स्टोअर्स उघडण्याचे लक्ष्य असून, यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यासारख्या प्रमुख बाजारपेठांवर विशेष भर असेल.