PM Narendra Modi Independence Day Speech: ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशातील युवकांसाठी “पंतप्रधान विकसीत भारत रोजगार योजना” (PM Viksit Bharat Rojgar Yojana) ही भव्य योजना जाहीर केली आहे. या नव्या योजनेसाठी तब्बल १ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळालेल्या युवकांना १५,००० रुपयांचे थेट प्रोत्साहन मिळणार असल्याची घोषणा मोदींनी केली.
या योजनेचा थेट फायदा सुमारे ३.५ कोटी युवकांना मिळणार आहे. त्याचबरोबर नव्या संसाधनांची उपलब्धता करणाऱ्या कंपन्यांना देखील प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे. यामुळे खासगी क्षेत्रातील रोजगार निर्मितीला मोठा चालना मिळणार आहे.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले, “युवा वर्गासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी माझ्या देशातील तरुणांसाठी तब्बल १ लाख कोटी रुपये खर्च करून ही योजना सुरू करत आहे. देशाच्या प्रगतीत युवकांचे योगदान महत्त्वाचे आहे; त्यामुळे नवीन कल्पनांना, स्टार्टअप्सना वाव देणे, आणि नवनव्या दिशांनी पुढे जाणे, या योजनेद्वारे शक्य होणार आहे.”
या योजनेअंतर्गत १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२७ दरम्यान खासगी क्षेत्रात निर्मित प्रत्येक नव्या नोकरीसाठी १५,००० रुपयांची रक्कम तरुणांना दिली जाईल. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळानेही या योजनेस मान्यता दिली असून, दोन वर्षांत ३.५ कोटींपेक्षा जास्त नवे रोजगार निर्माण करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यातील १.९२ कोटी तरुण पहिल्यांदाच मनुष्यबळ क्षेत्रात येतील, असे मोदी म्हणाले.
ज्या कंपन्या नव्या युवकांना नोकरी देणार त्यांनाही विविध सवलती आणि पायाभूत प्रोत्साहन दिले जाईल, जेणेकरून रोजगाराच्या संधी अधिक वाढतील. पंतप्रधानांनी युवा पिढीला आवाहन केले की, “तुम्ही नवनवे प्रयोग करा, कल्पना राबवा आणि कष्ट करा, कारण भारताच्या प्रगतीसाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे!”
ही योजना देशातील युवकांसाठी मोठी उमेद घेऊन आली असून, येत्या काळात लाखो तरुणांना स्थिर आणि गुणात्मक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.