PM Modi Speech From Red Fort: स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना मोठा दिलासा दिला आहे. सातत्याने वाढत्या महागाईमुळे चिंताग्रस्त असलेल्या सामान्यांना आणि लघुउद्योगांना अत्यंत महत्त्वाची घोषणा करत, मोदी यांनी यंदाच्या दिवाळीपूर्वी घराघरात आनंदाची लाट येईल असे सांगितले. “आता देशभरातील कर कमी करण्याची वेळ आली आहे. आम्ही सरकार म्हणून मागील आठ वर्षांत जीएसटीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या आहेत. आता नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म येणार आहेत,” असे मोदींनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे जीवनावश्यक वस्तूंवरचे कर दिवाळीपूर्वीच मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात येणार आहेत. यामुळे किराणा, कपडे, गृहउपयोगी वस्तू अशा दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त होतील आणि महागाईला आधार मिळेल. लघू व मध्यम उद्योगांनाही याचा थेट फायदा होणार असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
जीएसटीची पुनर्रचना करण्यासाठी उच्चस्तरीय समिती तयार करण्यात आली असून, त्या समितीने कार्य सुरू केले आहे. येत्या काही महिन्यांत हा नव्या युगाचा जीएसटी रिफॉर्म प्रत्यक्षात आला, तर सर्वच भारतीयांसाठी दिवाळी हे द्विगुणित आनंद घेऊन येणार आहे. या बदलामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळेल आणि सर्वसामान्यांच्या खिशावरचा ताणही कमी होईल.
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्षी पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा देशवासीयांमध्ये आशा, अपेक्षा आणि एकतेचे नवे पर्व जागृत केले आहे. “स्वातंत्र्याचा हा सण १४० कोटी लोकांच्या गौरवाचा आहे. आज प्रत्येकजण तिरंग्यात रंगला आहे. भारत आता नव्या युगाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे,” असे मोदींनी आपल्या भाषणात नमूद केले.