PM Modi Independence Day Speech: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय ध्वज फडकावून देशवासीयांना संबोधित केले. आपल्या बाराव्या सलग स्वातंत्र्यदिन भाषणात त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये देशात तयार झालेल्या ‘मेड इन इंडिया’ चिप्स यावर्षाअखेर बाजारात येतील, असे सांगितले. भारताची सेमीकंडक्टर मोहीम वेगाने प्रगती करत असल्याचे त्यांनी नमूद केले आणि अणुऊर्जा क्षेत्रातही मोठी पावले उचलत असल्याची माहिती दिली.
पाकिस्तानकडून येणाऱ्या अण्वस्त्र धमक्यांबाबत मोदी ठामपणे म्हणाले — “भारत आता अण्वस्त्र ब्लॅकमेल सहन करणार नाही. राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादाच्या प्रकरणांमध्ये सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.”
मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत सांगितले की, पाहीलगाव दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांचा बदला घेण्यासाठी सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आणि दशकांपासून न साधलेली कामगिरी साध्य झाली. “जे दहशतवाद्यांना मदत करतात, तेही मानवतेचे शत्रू आहेत आणि त्यांना वाचवले जाणार नाही,” असे ते म्हणाले.
सिंधू नदीच्या पाण्याविषयी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. सिंधूचे पाणी भारतातील शेतकरी आणि नागरिकांसाठीच वापरले जाईल. या पाण्याचा हक्क फक्त भारताचा आहे.”
या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाची थीम “नवा भारत” अशी असून, मोदींनी १४० कोटी भारतीयांच्या एकतेचा गौरव केला. “हे अभिमानाचे, १४० कोटी वचनांचे पर्व आहे. प्रत्येक भारतीय आज तिरंग्याच्या रंगात रंगला आहे,” असे ते म्हणाले.
तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भरतेवर भर देत मोदींनी सांगितले की, २१ वे शतक तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि इतिहासाने दाखवून दिले आहे की तंत्रज्ञान स्वीकारणारे देशच वेगाने विकसित होतात. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात भारताने २०३० पर्यंत ५०% क्षमतेचे उद्दिष्ट ठेवले होते, पण हे लक्ष्य २०२५ मध्येच, म्हणजे पाच वर्षे अगोदर गाठल्याचे त्यांनी जाहीर केले.
युवकांना उद्देशून त्यांनी संशोधन आणि विकास (R&D) क्षेत्रात, विशेषतः अवकाश विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्रात पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कोरोना महामारीच्या काळात भारताने स्वतःची लस तयार करून जगाला दाखवून दिले की आत्मनिर्भर भारत कोणत्याही संकटाला समर्थपणे सामोरा जाऊ शकतो.
मोदींचा हा संदेश केवळ घोषणांनी भरलेला नव्हता, तर त्यातून ‘नवा भारत’ घडवण्याची स्पष्ट दिशा आणि दृढनिश्चयही उमटत होता.