Pik Vima Delay: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या नुकसानभरपाईच्या रकमेची प्रतीक्षा कायम आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीसाठी मंजूर झालेली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास विलंब होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून, त्यांचा संताप वाढत आहे.
मागील खरीप आणि रब्बी हंगामातील 88,412 शेतकऱ्यांसाठी 104 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली होती. यापैकी केवळ 65,620 शेतकऱ्यांच्या खात्यात 89 कोटी 86 लाख 40 हजार रुपये जमा झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना अद्याप त्यांच्या हक्काच्या रकमेची वाट पाहावी लागत आहे. खरीप 2024 हंगामासाठी 2 लाख 39 हजार शेतकऱ्यांसाठी 279 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यापैकी काही शेतकऱ्यांना दोन महिन्यांत रक्कम मिळाली, परंतु 69,953 शेतकऱ्यांचे 81 लाख 95 हजार रुपये अद्याप प्रलंबित आहेत. विमा कंपन्यांनी ही रक्कम शासनाकडून पैसे मिळाल्यावर जमा करण्याचे आश्वासन दिले होते.
राज्य शासनाने 7 जुलै 2025 रोजी खरीप हंगामाची संपूर्ण रक्कम विमा कंपन्यांकडे जमा केली. तरीही, विमा कंपन्यांनी केवळ 49 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 71 कोटी 5 लाख रुपये जमा केले आहेत. रब्बी हंगामासाठी 18,500 शेतकऱ्यांसाठी 22 कोटी रुपये मंजूर असून, त्यापैकी 16,681 शेतकऱ्यांना 18 कोटी 82 लाख रुपये मिळाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांची रक्कम अद्याप जमा झालेली नाही.
शेतकरी गेल्या वर्षी जुलै महिन्यात विमा हप्ता भरून ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये नुकसान सहन करूनही अद्याप प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगामाचे 21 हजार शेतकऱ्यांचे 11 कोटी रुपये आणि रब्बी हंगामातील काही रक्कम अद्याप वाटप झालेली नाही. यावर्षीच्या खरीप हंगामाची काढणी सुरू होण्याच्या तयारीत असताना मागील वर्षांचे पैसे मिळाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
विमा कंपन्या केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मिळाल्यावरही तांत्रिक कारणे आणि हिशोबाची प्रक्रिया सांगत विलंब करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. “विमा हप्ता भरण्यासाठी आम्हाला वेळेची मर्यादा आहे, मग नुकसानभरपाई का रखडते?” असा सवाल शेतकरी मनोज साठे यांनी उपस्थित केला.
या विलंबामुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर खर्चासाठी भांडवल उभे करण्यात अडचणी येत आहेत. शासनाने विमा कंपन्यांना तातडीने रक्कम जमा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.