Onion Subsidy Nashik: नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. 2023 मध्ये लाल कांद्याच्या कोसळलेल्या किमतींमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून 9,988 शेतकऱ्यांना 18 कोटी 58 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. राज्य सरकारने एकूण 14,661 शेतकऱ्यांसाठी 28.32 कोटी रुपये मंजूर केले असून, यामुळे दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झाली आहे.
2023 मध्ये लाल कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर, 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत बाजार समित्या, खासगी बाजार आणि नाफेड केंद्रांवर कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने 27 मार्च 2023 रोजी प्रति क्विंटल 350 रुपये आणि जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, 7/12 उताऱ्यावरील तांत्रिक त्रुटींमुळे नाशिकमधील 9,988 शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले होते. याबाबत अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी 12 जून 2025 रोजी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. तसेच, त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानंतर या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा मार्ग मोकळा झाला. यानंतर सरकारने शासन निर्णय जारी करून अनुदान वितरणाला मंजुरी दिली.