Nevasa Fire Tragedy: नेवासा फाटा येथील कालिका फर्निचर गोदामाला मध्यरात्री दीडच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत रासने कुटुंबातील पाच जणांचा होरपळून आणि धुराने गुदमरून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत मयूर अरुण रासने (वय 36), त्यांची पत्नी पायल मयूर रासने (वय 30), मुले अंश मयूर रासने (वय 10), चैतन्य मयूर रासने (वय 6) आणि आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (वय 85) यांचा मृत्यू झाला आहे. यश किरण रासने (वय 25) गंभीर जखमी असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाट्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर, ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसरात घडली. रासने कुटुंबाचे कालिका फर्निचर दुकान खाली आणि वरच्या मजल्यावर निवासस्थान आहे, तर मागील बाजूस गोदाम आहे. मध्यरात्री आग लागली तेव्हा कुटुंब गाढ झोपेत होते. लाकडी फर्निचर, भुसा आणि फोममुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. रिमझिम पाऊस सुरू असतानाही आग प्रचंड वेगाने पसरली, ज्यामुळे कुटुंबाला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले की, मृत्यूचे कारण जळणे आणि धुराने गुदमरून मृत्यू असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण शॉर्ट सर्किट असावे, असे काही स्थानिकांचे मत आहे, परंतु पोलिसांचा तपास सुरू असून नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मयूर रासने यांचे वडील अरुण रासने आणि त्यांची पत्नी मालेगाव येथे नातेवाइकांकडे गेले होते, त्यामुळे ते या दुर्घटनेतून बचावले.
आगीची माहिती मिळताच नेवासा पंचायत समिती आणि भेंडा येथील ज्ञानेश्वर कारखान्याच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. नेवासा पोलिसांनीही तातडीने कारवाई करत बचावकार्य सुरू केले. पहाटेपर्यंत आग धुमसत होती आणि सकाळी ती पूर्णपणे आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला होता.
या घटनेने नेवासा परिसरात शोककळा पसरली आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी राहता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारात एका कुटुंबातील पाच जणांच्या आत्महत्येची घटना घडली होती. त्यानंतर आता ही दुर्घटना घडल्याने अहिल्यानगर जिल्हा हादरला आहे.