चिखली (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि महात्मा गांधी जयंतीपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याच्या उपक्रमांतर्गत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’चा भव्य शुभारंभ आज मौजे किन्होळा येथे झाला.
या अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाकडून रोख पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. तसेच, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान होणार आहे. यामुळे गावोगावी प्रगतीचा नवा अध्याय सुरू होणार असून, गावपातळीवर स्पर्धात्मकतेतून विकासाला गती मिळेल.
याच उपक्रमाच्या अनुषंगाने महिलांसाठी विशेष मोफत आरोग्य शिबिर आज किन्होळा येथे आयोजित करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ८:३० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात फिजिशियन, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, दंतरोगतज्ज्ञ आणि शल्यचिकित्सक यांसारख्या विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिल्या. अनेक माता-भगिनींनी या शिबिराचा लाभ घेतला.
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी या अभियान आणि शिबिराचे महत्त्व विशद करताना सांगितले, “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे गावकऱ्यांना दर्जेदार सुविधा मिळतील आणि विकासकामांना गती मिळेल. महिलांसाठी आयोजित आरोग्य शिबिर केवळ उपचारांपुरते मर्यादित नसून, त्यातून आरोग्याविषयी जागरूकता वाढेल. ग्रामविकासासोबतच आरोग्यदायी समाजाची निर्मिती हा खरा आत्मनिर्भरतेचा पाया आहे.”
गावांचा विकास, महिलांचे आरोग्य आणि सर्वांगीण प्रगती यांचा संगम घडवणारे हे उपक्रम ग्रामपंचायती आणि स्थानिक जनतेला नवे बळ देणारे ठरतील.
या सोहळ्यात माजी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, सोसायटी अध्यक्ष आणि शाळा समिती अध्यक्ष यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. अर्चनाताई जाधव, गटविकास अधिकारी श्री. समाधान वाघ, सद्य गटविकास अधिकारी श्री. गजानन पोफळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. पंजाबराव धनवे, प्रा. श्री. वीरेंद्र वानखेडे, ग्रामसेवक श्री. मदन कुटे, ग्रामस्थ, महिला आणि सत्कारमूर्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.















1 thought on “गावांच्या विकासाला नवे बळ – ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’चा भव्य शुभारंभ किन्होळा येथून, महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचाही लाभ”