Marathwada Rain Crisis: मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला आहे. रावणगाव, हसनाळ, भासवाडी आणि भिंगेली या चार गावांमध्ये पाण्याचा वेढा पडल्याने 293 नागरिक अडकले आहेत. या गावांमध्ये पाणी शिरल्याने घरांचे पत्रे कोसळले, रस्ते बंद झाले आणि जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तातडीने पावले उचलत लष्कर, एसडीआरएफ आणि शीघ्र कृती दल पथकांना पाठवले आहे.
मुखेड तालुक्यातील भेंडेगाव पूर्णपणे पाण्याने वेढले गेले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची धांदल उडाली आहे. बेरळी येथील जुन्या गावाला जोडणारा पूल पाण्याच्या लोंढ्याने वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. इसापूर धरणाचे दरवाजे उघडल्याने पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु पाण्याचा जोर कायम आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातही पावसाने कहर केला आहे. उदगीर-मुक्रमाबाद-देगलूर रोडवरील धडकनाळ-रावी मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने एक कार वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उदगीर-देगलूर, उदगीर-हानेगाव आणि माणकेश्वर-उदगीर मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहने हानेगाव-एकंबा-मुर्की मार्गाने वळवण्यात आली आहेत.
रेणा नदीच्या काठावरील रेणापूर, जवळगा आणि बंधारा येथील पाणी पातळी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, नागरिकांना पाण्याजवळ जाणे, जनावरे झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ बांधणे टाळण्याचे आवाहन केले आहे. मुलांना नदी किंवा जलसाठ्यांजवळ खेळण्यासाठी पाठवू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथून लष्कराची एक तुकडी आणि आपत्ती निवारण पथक मुखेड येथे दाखल झाले आहे. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या देखरेखीखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रावणगाव (225), हसनाळ (7-8), भासवाडी (20) आणि भिंगेली (40) येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश आले आहे.
1 thought on “मराठवाड्यात पावसाचा हाहाकार! 293 नागरिक पाण्यात अडकले, काय आहे पूरस्थिती?”