लोणार (बातमीवाला): बुलढाणा जिल्ह्यातील लोणार-लोणी या रस्त्यावर २९ ऑक्टोबर रोजी दुपारी घडलेल्या भयानक अपघातात एका ३१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. जांबुल ते देवुळगाव वायसा या दरम्यान भरधाव मिनीबसने रमेश काळुराम मरमट या युवकाला जोरदार धडक दिली. अपघातानंतर उपचार सुरू असतानाच रमेश यांचा मृत्यू झाला, तर मिनीबस चालक वाहन सोडून फरार झाला.
मूळ सिल्लोड तालुक्यातील सोनपवाडी, मारोती मंदिराजवळील रहिवासी असलेले रमेश मरमट (३१) यांना अचानक आलेल्या एमएच ३९ डी ०८०२ या क्रमांकाच्या मिनीबसने धडक देऊन गंभीर जखमी केले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले, पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर चेतन प्रमोद चौधरी यांनी लोणार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, लोणार पोलीसांनी मिनीबस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.














