IPL 2025 Revenue Decline: आयपीएल 2025 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विक्रमी कमाई करत 11,703 कोटी रुपयांचा महसूल मिळवला असला तरी, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि लखनौ सुपर जायंट्स या तीन प्रमुख फ्रँचायझींच्या आर्थिक कामगिरीत मोठी घट झाली आहे. कमी सामन्यांची संख्या, वाढता खर्च आणि फ्रँचायझी शुल्क यामुळे या संघांना आर्थिक फटका बसला आहे.
मुंबई इंडियन्सने आर्थिक वर्ष 2025 मध्ये 697 कोटी रुपये महसूल कमावला, जो गेल्या वर्षीच्या 737 कोटींपेक्षा कमी आहे. त्यांचा नफाही 109 कोटींवरून 84 कोटींवर घसरला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीच्या या फ्रँचायझीला SA20, मेजर लीग क्रिकेट आणि महिला प्रीमियर लीग WPL यासारख्या इतर स्पर्धांमधूनही उत्पन्न मिळते, परंतु आयपीएल सामन्यांची कमी संख्या यंदाच्या घसरणीचे प्रमुख कारण ठरली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर च्या महसुलातही मोठी घट झाली आहे. 2024 मध्ये 649 कोटी रुपये कमावणाऱ्या RCB ने 2025 मध्ये केवळ 514 कोटी रुपये महसूल नोंदवला. यामागील कारण म्हणजे आयपीएल 2025 मध्ये कमी सामने खेळावे लागणे, असे फ्रँचायझीने स्पष्ट केले आहे. RCB चा नफा 222 कोटींवरून 140 कोटींवर आला आहे. तरीही, फ्रँचायझीने 120 कोटी रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सी ICRA च्या अहवालानुसार, RCB च्या आर्थिक वर्ष 2025 च्या महसुलावर आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक आणि चौथ्या तिमाहीतील सामन्यांची संख्या यांचा मोठा परिणाम होईल.
लखनौ सुपर जायंट्स ची अवस्था यंदा आणखी बिकट आहे. RPSG स्पोर्ट्सने 2025 मध्ये 557 कोटी रुपये महसूल कमावला, परंतु 72 कोटींचा तोटा सहन केला आहे. गेल्या वर्षी 694 कोटींच्या महसुलावर 59 कोटींचा नफा कमावणाऱ्या LSG ला यंदा 709 कोटींच्या वार्षिक फ्रँचायझी शुल्काचा मोठा फटका बसला आहे. RPSG व्हेंचर्सचे अध्यक्ष संजीव गोयंका यांनी सांगितले की, LSG ने मजबूत चाहता वर्ग आणि आकर्षक प्रायोजकत्व मिळवले आहे. तिकीट विक्री आणि प्रसारण हक्कांमधून मिळणारा महसूल यामुळे फ्रँचायझीचा व्यवसाय सकारात्मक दिशेने आहे, परंतु तोटा कमी करण्यासाठी आणखी प्रयत्न आवश्यक आहेत.
दुसरीकडे, बीसीसीआयने आयपीएल 2024 मधून 11,703 कोटींची कमाई केली, ज्यात 8,744 कोटी रुपये माध्यम हक्क, 2,163 कोटी रुपये फ्रँचायझी शुल्क आणि 758 कोटी रुपये प्रायोजकत्वातून मिळाले. यापैकी 4,578 कोटी रुपये आयपीएल संघांना वितरित करण्यात आले. आयपीएल सामन्यांचे दोन आर्थिक वर्षांमध्ये विभागले जाणारे वेळापत्रक आणि वाढता खर्च यामुळे फ्रँचायझींना आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.