ICICI Reduces Minimum Balance: आयसीआयसीआय बँकेने नव्या बचत खातेदारांसाठी किमान मासिक सरासरी शिल्लक (MAB) ची अट 50,000 रुपयांवरून 15,000 रुपये इतकी कमी केली आहे. ग्राहकांच्या तीव्र विरोधानंतर आणि बँकेने शहरी भागातील नव्या खातेदारांसाठी किमान शिल्लक 10,000 वरून 50,000 रुपये केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत हा निर्णय घेण्यात आला आहे. हा बदल 1 ऑगस्ट 2025 पासून उघडलेल्या नव्या बचत खात्यांना लागू होईल.
शहरी आणि मेट्रो भागातील नव्या खातेदारांसाठी आता किमान शिल्लक 15,000 रुपये ठेवावी लागेल, जी यापूर्वीच्या 10,000 रुपयांच्या तुलनेत 5,000 रुपये जास्त आहे. अर्धशहरी भागातील नव्या खातेदारांसाठी ही अट 25,000 वरून 7,500 रुपये इतकी कमी करण्यात आली आहे, तर ग्रामीण भागातील खातेदारांसाठी ती 10,000 वरून 2,500 रुपये इतकी आहे. विद्यमान खातेदारांसाठी मात्र शहरी आणि अर्धशहरी भागात किमान शिल्लक 5,000 रुपये इतकीच राहील.
ग्राहकांच्या तक्रारींना यश
आयसीआयसीआय बँकेने 1 ऑगस्ट 2025 पासून नव्या खातेदारांसाठी किमान शिल्लक 50,000 रुपये निश्चित केल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर आणि ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी एवढी मोठी रक्कम ठेवणे कठीण असल्याने हा निर्णय मध्यमवर्गाला झटका देणारा ठरला होता. ग्राहकांच्या या तक्रारी आणि टीकेच्या पार्श्वभूमीवर बँकेने हा निर्णय मागे घेत नवी शिल्लक अट लागू केली आहे.
बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे, “आम्ही 1 ऑगस्ट 2025 पासून नव्या बचत खात्यांसाठी नव्या किमान शिल्लक अटी लागू केल्या होत्या. ग्राहकांच्या मौल्यवान अभिप्रायानंतर आम्ही या अटी ग्राहकांच्या अपेक्षांनुसार सुधारित केल्या आहेत.”
दंडाची तरतूद कायम
नव्या अटींनुसार, जर खातेदार किमान शिल्लक राखण्यात अपयशी ठरले, तर 6 टक्के दंड किंवा 500 रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल, ती आकारली जाईल. हा दंड यापूर्वीच्या दंडापेक्षा जास्त आहे, त्यामुळे खातेदारांना आपली मासिक शिल्लक काळजीपूर्वक राखावी लागेल.
विशेष सूट कोणाला?
आयसीआयसीआय बँकेने काही विशेष श्रेणींना किमान शिल्लक अटीतून सूट दिली आहे. यामध्ये 60 वर्षांखालील पेन्शनधारक, 1,200 निवडक संस्थांमधील विद्यार्थी, पगार खाते, ज्येष्ठ नागरिकांचे खाते, बेसिक बचत बँक खाते आणि विशेष गरजा असलेल्या व्यक्तींच्या खात्यांचा समावेश आहे.