बातमीवाला: हरियाणा सरकारच्या ई-ऑक्शनमध्ये ‘HR 88 B 8888’ हा विशेष वाहन नोंदणी क्रमांक बुधवारी १ कोटी १७ लाख रुपयांना विकला गेला. त्यामुळे हा देशातील आतापर्यंतचा सर्वात महागडा नंबर प्लेट ठरला आहे.
हरियाणा परिवहन विभागाच्या fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर झालेल्या या लिलावात ४५ बोली लावणाऱ्यांनी भाग घेतला होता. सकाळी दहा वाजता ५० हजार रुपये आधारभूत किमतीने सुरू झालेला लिलाव दुपारी पाच वाजेपर्यंत चालला. शेवटच्या तासात बोलीचा आकडा झपाट्याने वाढला आणि अखेर हिसार येथील सुधीर कुमार यांनी १.१७ कोटींची बोली लावून हा क्रमांक आपल्या नावे करून घेतला.
या नंबरचे खरे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील ‘B’ हे अक्षर दूरवरून किंवा वेगाने पाहिले तर ‘८’ सारखे दिसते. त्यामुळे संपूर्ण प्लेट ‘HR 888 8888’ किंवा सलग आठ-आठ अशी दिसते. भारतीय तसेच चिनी संस्कृतीत आठ हा अंक समृद्धी, सौभाग्य आणि भरभराटीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळेच अशा दुर्मीळ आणि सलगच्या आठ अक्षरांच्या संयोजनाला प्रचंड मागणी असते.
यापूर्वी हरियाणामध्येच ‘HR 22 W 2222’ हा क्रमांक ३७.९१ लाखांना विकला गेला होता, पण ‘HR 88 B 8888’ ने तो विक्रम सहज मोडला. हा नंबर कुंडली आरटीओ (कोड ८८) अंतर्गत येतो.
परिवहन विभागाने सांगितले की, अशा विशेष नंबरच्या लिलावातून मिळणारी संपूर्ण रक्कम रस्ते सुरक्षा, अपघात निवारण आणि रस्ते विकास योजनांसाठी वापरली जाते.
आता फॅन्सी नंबर प्लेट्स हे केवळ स्टेटस सिम्बॉल न राहता एक मोठे गुंतवणुकीचे साधन बनले आहेत, हे या विक्रमी बोलीने पुन्हा एकदा सिद्ध झाले.















