CP Radhakrishnan: महाराष्ट्राचे राज्यपाल आणि माजी खासदार सी. पी. राधाकृष्णन यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. राधाकृष्णन यांनी सोमवारी दिल्लीत पोहोचून पंतप्रधान मोदींसह एनडीएच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली.
उमेदवारी आणि राजकीय रणनीती
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची एनडीएने उपराष्ट्रपतिपदासाठी निवड केली आहे. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, “20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सी. पी. राधाकृष्णन यांचा उमेदवारी अर्ज दाखल होईल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सर्व एनडीए नेते या प्रक्रियेत सहभागी होतील.” राधाकृष्णन यांनी सोमवारी दिल्लीत आगमन करताच केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, प्रल्हाद जोशी, किरेन रिजिजू आणि टीडीपीचे के. राममोहन नायडू यांनी त्यांचे स्वागत केले. त्याच संध्याकाळी एनडीए नेत्यांच्या बैठकीत राधाकृष्णन यांचा सत्कार करण्यात आला.
पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट करत म्हटले, “सी. पी. राधाकृष्णन यांनी आपल्या दीर्घ सार्वजनिक सेवेत समर्पण आणि बुद्धिमत्तेचा परिचय दिला आहे. त्यांचा विविध क्षेत्रांतील अनुभव देशाला समृद्ध करेल. त्यांना माझ्या शुभेच्छा!”
उपराष्ट्रपति निवडणुकीचा रंग
उपराष्ट्रपति निवडणूक 9 सप्टेंबरला होणार असून, अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट आहे. एनडीएची संख्यात्मक ताकद राधाकृष्णन यांच्या विजयाची खात्री देते, तरीही विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने स्वतःचा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
यशस्वी रणनीती आणि समर्थन
एनडीएने राधाकृष्णन यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाने समर्थन जाहीर केले आहे, ज्यांचे संसदेत 11 खासदार आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत रेड्डी यांच्याशी चर्चा केली. तसेच, ओडिशाच्या बीजेडी आणि तेलंगणाच्या बीआरएस या पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. सूत्रांनुसार, 781 सदस्यांच्या निवडणूक मंडळात एनडीएला 440 पेक्षा जास्त खासदारांचा पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे.