चिखली (बातमीवाला): चिखली विधानसभा मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेला मजबूत करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग बोर्ड आणि नवीन सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. या कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सय्यद उमर यांच्यासह रुग्णालयातील अनेक तज्ज्ञ डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी हजर होते.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात चिखली ग्रामीण रुग्णालयात मूलभूत आरोग्य सुविधांचा खूप अभाव होता. पण आमदार श्वेता महाले पाटील यांच्या निरंतर प्रयत्नांमुळे आता हे रुग्णालय आधुनिक वैद्यकीय केंद्रात रूपांतरित झाले आहे. त्यांनी इथे डायलिसिस सेंटर सुरू केले, तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील लसीचे मोफत वाटप पूर्ण मतदारसंघात केले. याशिवाय आवश्यक बांधकामांसाठी निधी मिळवला आणि प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमणुकीसाठी सतत फॉलोअप घेतला. या सर्व प्रयत्नांमुळे आज चिखली ग्रामीण रुग्णालय सामान्य लोकांच्या उपचारांसाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे.
याआधी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चिखली तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना बुलढाण्याला जावे लागत असे. त्यामुळे वेळ, पैसा आणि शारीरिक त्रास होत होता. आता आमदार श्वेता महाले पाटील यांच्या प्रयत्नांमुळे चिखलीतच दिव्यांग बोर्ड सुरू झाला आहे. यामुळे दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी चिखली विधानसभा मतदारसंघातील सर्व दिव्यांग व्यक्तींना अपंगत्व तपासणी आणि प्रमाणपत्र मिळू शकेल. या नव्या सुविधेमुळे तालुक्यातील दिव्यांग नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या कार्यक्रमात आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनचेही लोकार्पण झाले. या मशीनमुळे आता चिखली ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी तपासणी मोफत उपलब्ध होईल. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होईलच, पण विशेषतः गर्भवती महिलांना महागड्या तपासण्यांसाठी खासगी रुग्णालयांकडे जाण्याची गरज पडणार नाही.
“रुग्णालय हे सामान्य लोकांचे आरोग्य मंदिर आहे. इथे गरजेच्या सुविधा उपलब्ध करणे ही माझी जबाबदारी आहे. प्रत्येक आई, बहीण आणि मातेला वेळेवर योग्य उपचार मिळावेत, ही माझी भूमिका आहे,” असे आमदार श्वेता महाले पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सय्यद उमर, नेत्रचिकित्सक डॉ. रवी शिंदे, अस्थिरोगतज्ञ डॉ. निकम, मानसोपचारतज्ञ डॉ. खर्चे, बालरोगतज्ञ डॉ. रामानंद इंगळे, डॉ. उमेश सावजी, डॉ. विठ्ठल काळुसे, डॉ. दीपक भगत, डॉ. प्रशांत चिंचोले, डॉ. अमोल राजपूत, डॉ. राहुल राजपूत, डॉ. नेहा चिंचोले, डॉ. प्रीती रिंडे, डॉ. रश्मी पाटील, डॉ. प्रतिक्षा वायाळ, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. आदेश पखाले, डॉ. भूषण वानखेडे, डॉ. किशोर गवळी, डॉ. फारुख शेख, डॉ. प्रदीप मेहत्रे, श्री. रमेश डोके, सुशील वाहक, श्रीकृष्ण अवचार, सुशील वाघ, कार्तिक काकडे, संदीप दळवी, पुरुषोत्तम काळे, सुरज खिल्लारे, विशाल भगत, अमोल मेहत्रे, श्रीमती पूजा भांबळे, असलम शेख आदी उपस्थित होते.














