Chhatrapati Sugar Factory Salary Increase: भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने कामगारांच्या पगारात तब्बल १० टक्क्यांची वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार ही वेतनवाढ देण्यास कारखान्याच्या संचालक मंडळाने तत्त्वतः मान्यता दिली असून, हा करार लागू करणारा श्री छत्रपती कारखाना राज्यातील पहिला साखर कारखाना ठरला आहे.
कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाने साखर कारखान्यांतील कामगारांच्या विविध मागण्यांसाठी नियुक्त केलेल्या त्रिपक्षीय समितीच्या २३ जुलै रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. करारानुसार, १ एप्रिल २०२४ पासून कारखान्यातील सर्व अधिकारी आणि कामगारांच्या एकूण पगारावर — ज्यामध्ये मुळ पगार, महागाई भत्ता आणि स्थिर भत्ता यांचा समावेश आहे — १० टक्के वाढ करण्यात येणार आहे. यासोबतच आवश्यक सोयी-सुविधाही दिल्या जाणार आहेत.
ही वाढ लागू होण्यासाठी कराराची अंमलबजावणी सर्व साखर कारखान्यांमध्ये होणे आवश्यक होते. मात्र, भवानीनगर येथील श्री छत्रपती साखर कारखान्याने या अंमलबजावणीत पुढाकार घेत कामगारांना दिलासा दिला आहे.
शुगर वर्कर्स युनियनने यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाकडे विशेष विनंती केली होती. यामध्ये फॉर्म एलमध्ये बदल, वेतनवाढ, इतर सोयीसुविधा आणि २४ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या करारातील सुधारणा यांचा समावेश होता.
या निर्णयामुळे कामगारांमध्ये समाधानाची लाट असून, इतर साखर कारखान्यांसाठीही हा निर्णय आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.