जाफराबाद (बातमीवाला): अवैध वाळू उत्खनन आणि त्याची वाहतूक यावर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी तहसील कार्यालयाने महसूल आणि पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे संयुक्त भरारी पथक तयार केले आहे. हे पथक दिवस-रात्र काम करत असून, गेल्या वर्षभरात अवैध वाळू वाहतुकी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामुळे अशा लोकांमध्ये धडकी भरल्याचे दिसत आहे.
या कारवाईत महसूल विभागाने एकूण ४९ अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने पकडली आहेत. त्यातील २७ वाहनांवर फौजदारी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या सर्व कारवाईतून प्रशासनाला सुमारे ११२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात यश मिळाले आहे.
त्याचबरोबर तालुक्यातील विविध ४३ ठिकाणी अचानक धाडी टाकून ४८९ ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे. हा जप्त केलेला वाळू साठा शासकीय कामांसाठी आणि घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी वापरण्यात आला. यात २९१ लाभार्थ्यांना एकूण १४३७ ब्रास वाळूचे वाटप करण्यात आले आहे. शासनाच्या निर्णयानुसार आणि जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनानुसार तालुक्यात पाच वाळूघाट घरकुल योजनेसाठी खुले करण्यात आले आहेत.
दरम्यान, आळंद-देऊळझरी, हनुमंतखेडा आणि कुंभारझरी या भागात बोटींच्या साहाय्याने अवैध वाळू उत्खनन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महसूल विभागाने विशेष बैठे पथक स्थापन केले. या मोहिमेत १६ बोटी जप्त करून त्यांचा नाश करण्यात आला आहे. याशिवाय २२ वाहन मालक आणि ७ बोटधारकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
मात्र, नदीपात्रातील या कारवाईदरम्यान काही व्यावहारिक अडचणी येत आहेत. नदीपात्र मुख्य रस्त्यापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असल्याने पथकाला वेळेवर पोहोचणे कठीण जाते. दलदलीचा परिसर, दाट झुडपे आणि पाण्याच्या अडथळ्यामुळे बोटी पकडणे आणखी अवघड होते. शिवाय, तहसील कार्यालयाकडे स्वतःची बोट किंवा प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध नसल्याने कारवाईला उशीर होतो, अशी माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
या सातत्यपूर्ण कारवाईमुळे अवैध वाळू वाहतुकीशी संबंधित बोट आणि वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने येत्या काळात आणखी कठोर उपाययोजना राबवण्याचा इरादा व्यक्त केला आहे.













