चिखली (बातमीवाला): सोमठाणा येथील २९ वर्षीय स्वप्नील किशोर पवार यांचा मृतदेह आज सकाळी कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे फार्मसी महाविद्यालयासमोरच्या नाल्यात सापडला. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसात ते नाल्यात पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पावसाच्या वेगवान पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेले स्वप्नील हे शेवटी या नाल्यात अडकले आणि मृत्युमुखी पडले असावेत, असे पोलिसांचे प्राथमिक मत आहे.
माहितीनुसार, स्वप्नील हा सोमठाणा येथील स्थानिक रहिवासी असून, कुटुंबीयांनी त्यांच्या हरवल्याबाबत २६ ऑक्टोबरला चिखली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ शोधक कार्य सुरू केले. विविध ठिकाणी तपास करत असताना आज सकाळी ही करुण घटना समोर आली. मृतदेह सापडल्याने कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी प्राथमिक तपास घेतला असून, मृतदेह जिल्हा उपजिल्हा रुग्णालय, चिखली येथे पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. सध्या पुढील तपास ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कदम आणि रोहिदास पंढरे करीत आहेत.














