ढेबेवाडी, १० ऑक्टोबर २०२५(बातमीवाला): येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले इंग्रजी विषयाचे प्रख्यात प्राध्यापक सुमंत जगताप यांनी कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला.
ते म्हणाले, “कर्मवीरांनी ग्रामीण आणि बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी अविस्मरणीय योगदान दिले. ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वावर आधारित शिक्षण पद्धती त्यांनी राबवली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन, सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक जागृती निर्माण केली. महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे.”
क्रीडा शिक्षक प्रा. दत्तात्रय रैनाक यांनी सांगितले, “कर्मवीरांनी शिक्षणाचे लावलेले रोपटे आज वटवृक्ष बनले आहे. गरिबांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी स्वावलंबनावर आधारित शिक्षण पद्धती राबवली.” त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी १०,००० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आणि कला शाखेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला दरवर्षी बक्षीस देण्याचे जाहीर केले.
रयत बँकेचे माजी चेअरमन प्रा. व्ही.पी. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि कर्मवीरांच्या आठवणी सांगितल्या. विद्यार्थिनी कु. स्वरा देशमुख हिने कर्मवीरांच्या जीवनातील प्रेरणादायी घटनांचा उल्लेख केला. यावेळी इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत शाळेत प्रथम आणि द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना दात्यांनी ठेवलेल्या रक्कमेच्या व्याजातून स्मृतिप्रित्यर्थ बक्षीसे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाला प्राचार्य एम. एस. पाटील, रयत बँकेचे संचालक विक्रमसिंह देसाई, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य प्रसाद जानुगडे, सौ. अनिता कडव, प्रा. डॉ. दादाराम साळुंखे, निलेश परदेशी, भरत कुंभार यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते. निवास जाधव यांनी प्रास्ताविक केले, राम कापसे यांनी आभार मानले, तर सौ. रोहिणी जाधव यांनी सूत्रसंचालन केले.














