Pimpri Metro Increase Frequency: पुणे मेट्रोने पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. येत्या 15 ऑगस्ट 2025 पासून मेट्रोच्या गर्दीच्या वेळेत दर 6 मिनिटांनी ट्रेन धावणार आहे. सध्या सकाळी 9 ते 11 आणि दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत दर 7 मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध आहे. नव्या बदलामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून, गणेशोत्सवापूर्वी प्रवास अधिक सुलभ होणार आहे. विनागर्दीच्या वेळेत मात्र दर 10 मिनिटांनी एक मेट्रो उपलब्ध असेल.
महामेट्रोने सध्या पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर (पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर आणि वनाज ते रुबी हॉल) मिळून दररोज 490 फेऱ्या चालवल्या जातात. नव्या वेळापत्रकानुसार, 15 ऑगस्टपासून फेऱ्यांची संख्या 554 वर जाणार आहे, म्हणजेच 64 अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जातील. या वाढीव फेऱ्यांमुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही आणि प्रवास अधिक आरामदायी होईल.
प्रवासी संख्येत वाढ
जुलै 2025 मध्ये पुणे मेट्रोला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, दैनंदिन प्रवासी संख्या 1 लाख 92 हजारांवर पोहोचली आहे. ऑगस्ट महिन्यातही ही संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत सरासरी 2 लाख 13 हजार 620 प्रवासी दररोज मेट्रोने प्रवास करत आहेत. विशेषतः पिंपरी-चिंचवड मेट्रो स्टेशनवर प्रवाशांची संख्या विक्रमी आहे, ज्यामुळे महामेट्रोला सर्वाधिक उत्पन्न मिळत आहे.
दर 6 मिनिटांनी मेट्रोचे नियोजन
महामेट्रो गेल्या दोन महिन्यांपासून दर 6 मिनिटांनी मेट्रो चालवण्यासाठी प्रयत्न करत होती. यासाठी अनेक तांत्रिक चाचण्या घेण्यात आल्या. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर हा निर्णय 15 ऑगस्टपासून लागू करण्यात येत आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले, “प्रवाशांच्या वाढत्या संख्येला सामावून घेण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी आम्ही फेऱ्यांची संख्या वाढवली आहे. 15 ऑगस्टपासून 554 फेऱ्यांसह दर 6 मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध होईल.”