Asim Munir Trolled: पाकिस्तानचे सैन्यप्रमुख फील्ड मार्शल असिम मुनीर हे सध्या सोशल मीडियावर टीकेचे धनी ठरत आहेत. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे झालेल्या एका ‘ब्लॅक-टाय’ डिनरमध्ये त्यांनी भारताची तुलना “चमकणाऱ्या मर्सिडीज” शी तर पाकिस्तानची तुलना “दगडांनी भरलेल्या डम्प ट्रक” शी केली. हे वक्तव्य करताना ते पाकिस्तानची ताकद सांगण्याचा प्रयत्न करत होते, मात्र शब्दांच्या चुकीच्या निवडीमुळे परिस्थिती उलटी झाली.
स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या माहितीनुसार, हे भाषण त्यांनी व्यापारी अदनान असद (पाकिस्तानचे मानद वाणिज्यदूत, टांपा) यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात दिले. ते म्हणाले, “भारत म्हणजे महामार्गावर धावणारी चमकदार मर्सिडीजसारखी कार, तर आम्ही आहोत दगडांनी भरलेला डम्प ट्रक. जर ट्रक कारला धडकला, तर नुकसान कोणाचं जास्त होईल?”
सोशल मीडियावर या वक्तव्यावरून पाकिस्तान्यांनीच त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. काहींनी त्यांना “आपल्या देशाचीच बेइज्जती करणारे” म्हटलं, तर काहींनी हे विधान पाकिस्तानच्या मागासलेपणाची थेट कबुली असल्याचं सांगितलं. एका युजरने लिहिलं, “मुनीर यांच्या विधानातील एकमेव सत्य म्हणजे भारत मर्सिडीज आहे आणि पाकिस्तान डम्प ट्रक. बाकी सगळं भ्रम आहे.”